
रत्नागिरी : मटका जुगार यासारखे अवैध धंदे चालविणाऱ्या काही गुंडांकडून खेड येथील पत्रकाराना धमकी व मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील पत्रकारांनी आजपासून खेड शहरातील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडलं आहे. दरम्यान प्रांताधिकारी अविश कुमार सोनोने तसेच पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांनी दोन वेळा उपोषणकर्त्या पत्रकारांची भेट घेत उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः उपोषणस्थळी येऊन चर्चा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं पत्रकारांनी स्पष्ट केलं आहे.
३ जून रोजी येथील एका वृत्तपत्राच्या कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून अवैध मटका जुगार अड्डे वाल्यांनी धुडगूस घालून खेड तालुक्यातील सर्व पत्रकारांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दुपारीच पोलीस स्थानकात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही. वृत्तपत्र कार्यालयात घुसून धमकी देणाऱ्या या गुंडांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली असती तर रात्री पत्रकारांना मारहाण घडली नसती. स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतलेल्या संशयास्पद भूमिकेची सविस्तर माहिती व धमकी व मारहाण प्रकरणाचा घटनाक्रम निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना कळविण्यात आला, मात्र तब्बल पंधरा दिवस उलटूनही कोणतीही दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली नाही. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची खात्यांतर्गत चौकशी करून निलंबित करण्यात यावे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांना तडीपार करावे अशी मागणी येथील पत्रकारांनी केली आहे. दरम्यान खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या पत्रकारांची भेट उपोषणाला पाठींबा दर्शविला.