रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : दलित, ओबीसी आणि मुस्लीम यांच्या समन्वयातून तयार झालेला बहुजन क्रांती मोर्चा आज रत्नागिरीत काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागातून मोर्चात नागरिक सहभागी झाले होते. चंपक मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, भारताच्या संविधानाला कोणताही धक्का लावला जाऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या. चंपक मैदानात विविध नेत्यांचे भाषण झाले. नंतर मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा प्रशासनाला मोर्चेकर्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.