रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांसाठी यंदा ही मांडवी पर्यटन महोत्सवाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. ‘मांडवी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था’ व ‘श्री भैरी देवस्थान ट्रस्ट’तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३० एप्रिल व १ मे दरम्यान महोत्सव मांडवी समुद्रकिनारी साजरा होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, राजीव कीर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. परिषदेला नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका दया चवंडे, रशिदा गोदड आदी उपस्थित होते.
मागीलवर्षी पहिल्यांदाच मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिल्या वर्षातही महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. रत्नागिरी नगर परिषदेने सुद्धा याचवेळी रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी नगर प्रशासनाकडून पुढच्या वर्षी दोन्ही महोत्सव एकत्रित केले जातील, अशी सांगण्यात येत होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने मांडवी पर्यटन महोत्सव स्वतंत्रपणे घेत असल्याचे पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी परिषदेत सांगितले. रत्नागिरी शहर, परिसर गोव्याप्रमाणे निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. तरी सुद्धा अनेक पर्यटक याइकडे पाठ फिरवतात. पर्यटकांची ही संख्या वाढावी, त्याचप्रमाणे स्थानिकांना रोजगार मिळावा हे यामागे उद्दीष्टे आहे. २८ एप्रिल रोजी सायंकाळी मांडवी भैरी मंदिर ते मांडवी समुद्र किनारा शोभायात्रा निघेल. सायंकाळी ६ वाजता वाळूशिल्प, खाद्य महोत्सवाचे उदघाटन व महोत्सवाला सुरुवात होईल. संध्याकाळी ७ वाजता महेरवाशिणींचा मेळावा, होम मिनिस्टर आदी स्पर्धा होणार आहेत. आमदार उदय सामंत, राजन साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना निमंत्रित केल्याची कीर यांनी सांगितले. २९ एप्रिलला मराठी व हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्रा, ३० एप्रिल रोजी फॅशन शो, स्थानिक लोककला आणि गाण्याचे कार्यक्रम तर १ मे २०१८ रोजी मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम होईल. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
२९ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता दिपस्तंभ कुरणवाडा ते गेट वे ऑफ रत्नगिरी, मांडवी अशी एक किलोमीटर लांबीची ही स्पर्धा असेल. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रकाश नाडर उपस्थिती असेल.
३६ स्टॉल्स उभारणार
पर्यटन महोत्सवात पर्यटकांना खेकडे, कोळंबी, कालवे, मटणवडे, कोंबडीवडे, भाकरी, बिर्याणी अशा मांसाहारी झणझणीत खास कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता येईल. जांभुळ, करवंद, तोरण, काजू आदी रानमेव्याचीही चव चाखता येईल. पर्यटन महोत्सवात एकूण ३६ स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे.