
रत्नागिरी, 9 मे : लाॅकडाऊनच्या काळात परराज्यातील मजूर अडकून पडले आहेत. आता परराज्यातील कामगार आणि विद्यार्थांच्या संयमाचा बांध सुटलेला पहायला मिळाला. त्यामुळेच रत्नागिरीत तामिळनाडूमधील काही कामगार आणि विद्यार्थी आज (शनिवार) रस्त्यावर उतरलेले पहायला मिळाले. अखेर पोलिसांनी मध्येच हा मोर्चा अडवत त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं.
लाॅकडाऊनमुळे सध्या रत्नागिरी शहरात तमिळनाडूमधील जवळपास ४५० कामगार आणि विद्यार्थी अडकलेत. एका एग्रीकल्चर कंपनीचे हे सर्व सेल्समन कामगार आहेत. तर याच कंपनीतच त्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. मात्र लाॅकडाऊनमुळे काम नसल्याने हातात पैसा नाही. दीड महिना हे कामगार व विद्यार्थी एमआयडीसी परिसरात असून अपुऱ्या सुविधा, अन्न-पाण्यापासून होत असलेले हाल याला कंटाळून आम्हाला आमच्या गावी सोडा या मागणीसाठी परराज्यातील विद्यार्थी शनिवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तामिळनाडूमधील कामगार हे समस्यांचा पाढा वाचणार होते. रत्नागिरीतल्या साळवी स्टाॅप इथून या सर्वांनी मोर्चाला सुरवात केली.
दरम्यान अचानक मोर्चा निघताच पोलीस दल अलर्ट झाले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना शिवाजीनगर येथे पोलिसांनी मोर्चाला अडवले. यामध्ये तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या गावी सोडा अशी मागणी पोलिसांकडे केली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली तसेच यावर काहीतरी तोडगा काढू असं आश्वासित केलं. दरम्यान या विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या राज्याची परवानगी मिळाली, की या सर्वांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.














