कोलकाता : आपल्या देशातील हिंदू स्वत:च्याच देशात कुठेही धार्मिक विधी आणि कामकाज मुक्तपणे करू शकत नाहीत, त्यामुळे हिंदूंचे हक्क या देशात अबाधित आहेत काय? अशी विचारणा रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मियांकडे केली. आपल्या शेजारील बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. हिंदूंचा दुबळेपणा हेच त्या मागील कारण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मकरसंक्रांतीनिमित्त कोलकाता येथील जाहीर सभेत सरसंघचालक बोलत होते.
बांगलादेशात होणार्या हल्ल्यांना केवळ हिंदू समाज जबाबदार आहे. कारण हा समाज संघटित आणि सशक्त नाही, असेही सरसंघचालक म्हणाले. रा. स्व. संघ कोणत्याही धर्माला विरोध करत नाही. हिंदूंना मजबूत करणे, हाच संघाच्या स्थापनेमागील एकमेव उद्देश आहे.त्यामुळे कोणत्याही समाज किंवा धर्माचा विरोध न करता हिंदूंना संघटित आणि सशक्त करण्याच्या दिशेने काम करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
अतिशय कठीण स्थितीशी सामना करत संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी संघाची स्थापना केली, याची आठवण भागवत यांनी उपस्थितांना करून दिली. तेव्हा भारताला सशक्त करण्यासाठी हिंदू समाजाला संघटित करण्याचा संकल्प आपण करू या, असे त्यांनी सांगितले.