मुंबई : स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना ’स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॅथॉन २०१७’ ही स्पर्धा वादात सापडली आहे. मॅरेथॉनच्या आयोजकांनी नियमानुसार असणारे शुल्क व सुरक्षा ठेवीची रक्कम पालिकेकडे भरली नाही. त्यामुळे २४ तासांंत रक्कम न भरल्यास अधिनियमातील तरतूदींनुसार खटला दाखल करू, असा इशाराच पालिकेकडून देण्यात आला आहे. ही स्पर्धा १५ जानेवारीला होणार आहे.
मॅरेथॉन ज्या मार्गावर आहे, तेथे जाहिरातींचे फलक आणि लेजर शो होणार आहेत. त्यासाठी जाहिरात शुल्क, भू – वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव असे ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ रुपये जमा करणे बंधनकारक आहे. नियमानुसार ही रक्कम भरावी, असे पत्र महापालिकेचे अनुज्ञापन अधिक्षक यांनी या आधीच दिले होते. तरीही आयोजकांनी रक्कम भरली नाही. यानंतर पालिकेने २४ तासांत रक्कम भरा, अशी नोटीस मॅरॅथॉन चे आयोजक, संयोजक ‘मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लि.’ यांना पाठवली. तरिही रक्कम भरली न गेल्यास अनधिकृतपणे जाहिरात फलक लावून शहराचे विपुद्रीकरण केले, असा पलिका अधिनियमानुसार खटला दाखल केला जाईल, अशी माहिती पालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.