पथनाट्याद्वारे प्रचार करणार; १८ जानेवारीला देशातील ३३ आरबीआय कार्यालयाला घेराव घालणार
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने एकला चलो रे, ही भूमिका घेतली आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहे, मुंबईतील सर्व नेत्यांची हीच इच्छा आणि मत आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाही याबाबत कळविले आणि त्यांनी आम्हाला अनुमती दिली आहे. त्यामुळे मुंबईत कोणाशी ही युती न करता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आरपीआय जोगेंद्र कवाडे गटासाठी काही जागा सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना व भाजपा युतीने २२ वर्षे महापालिकेत भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला आणि पथनाट्यातून आम्ही त्यांचे घोटाळे लोकांसमोर मांडू, असे त्यांनी सांंगितले. तसेच मुंबईतील अस्वच्छता, पेंग्विन हट्ट, मुंबईतील हॉस्पिटल्सची दुरावस्था, रोगराई हे प्रश्नही पथनाट्यातून मांडण्यात येईल. हे पथनाट्य शाहिर साबळे यांचे नातू व दिग्दर्शक केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे तयार केले आहे. मुंबईत २० जानेवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत दररोज ५ ठिकाणी हे पथनाट्य सादर होईल, अशी माहिती निरुपम यांनी दिली.
रिझर्व्ह बॆंक ऒफ इंडीया (आरबीआय) नोटाबंदीच्या विषयावर पूर्णतः अपयशी ठरली आहे त्यामुळे बुधवार, १८ जानेवारी रोजी दुपारी १२.०० वाजता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण देशातील ३३ आरबीआय कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे, असेही निरुपम यांनी सांगितले.
माजी खासदार मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, बिहारचे आमदार अजित शर्मा, माजी आमदार चरणसिंह सपरा, युसुफ अब्राहनी, पालिका विरोधी पक्षनेता प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील पत्रकार परिषदेत उपस्थित होते.