रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कॊंग्रेस आणि राष्ट्र्वादी कॊंग्रेस यांच्यात आघाडी होणे शक्य नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आघाडीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला. तटकरे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. मुंबईसाठी आघाडी फिस्कटली तरी राज्यातील अनेक जिल्ह्यां मध्ये आघाडीची काँग्रेस बरोबर जाण्याचाच निर्णय झाला आहे. त्यासाठी चर्चाही सुरू असल्याचे तटकरे म्हणाले.
संजय निरुपम यांच्या आडमुठेपणामुळेच आघाडी होऊ शकली नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीदेखील निरुपम यांच्याच भूमिकेची पाठराखण केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने आपली यादी जाहीर केली, असा चुकीचा आरोप केला. त्यामुळे मुंबई पालिकेसाठी आघाडीची शक्यता संपली आहे, असे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी तयार होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजप सत्तेत असूनही एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. सरकारने निर्णय घ्यायचा आणि सामनातून त्या विरोधात आसूड ओढायचे, असे शिवसेनेने चालवले आहे, अशी टीका तटकरे यांनी युतीवर केली.