नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानाचा समजला जाणारा पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म सन्मानांची घोषणा करण्यात आली. यात सात जणांना पद्मविभूषण, सात जणांना पद्मभूषण आणि ७५ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले.
पवार यांच्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (उत्तर प्रदेश), पी.ए. संगमा (मेघालय), सुंदरलाल पटवा (मध्यप्रदेश), के.जे येसुदास (केरळ), सद्गुरू जग्गी वासुदेव (तामिळनाडू) आणि उडिपी रामचंद्र राव(कर्नाटक) यांनादेखील पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.
तर, आध्यात्मिक क्षेत्रात काम करून समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या गायिका अनुराधा पौंडवाल आणि गायक कैलास खेर या महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. समीक्षक भावना सोमय्या यांचाही पद्मश्री पुरस्कारात समावेश आहे.
क्रिडा विभागात क्रिकेटपटू विराट कोहली, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर, हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण
– के.जे. येसुदास (कला-संगीत)
-सद्गुरू जग्गी वासुदेव (आध्यात्म)
– शरद पवार ( सामाजिक सेवा)
-मुरली मनोहर जोशी (सामाजिक सेवा)
– स्व. सुंदरलाल पटवा (सामाजिक सेवा) (मरणोत्तर)
– स्व. पी.ए. संगमा (सामाजिक सेवा) (मरणोत्तर)
पद्मभूषण
– विश्व मोहन भट्ट (कला-संगीत, राजस्थान)
– प्रा. डॉ. देवी प्रसाद द्विवेदी (साहित्य-शिक्षण, उत्तरप्रदेश )
– तेहेम्टन उद्वादिया (वैद्यकीय, महाराष्ट्र )
– रत्नसुंदर महाराज (आध्यात्म, गुजरात )
– स्वामी निरंजन नंदा सरस्वती (योग, बिहार )
– राजकुमारी महाचक्री शिरिधोर्न (परदेशी नागरिक, साहित्य, शिक्षण, थायलंड)
– दिवंगत चो. रामास्वामी (साहित्य, पत्रकारिता, तामिळनाडू) (मरणोत्तर)