विक्रोळीत कारला भीषण अपघात; एक ठार

भीषण अपघातात चेंदामेंदा झालेली कार.
मुंबई : दारू प्यायल्यानंतर भरधाव वेगात त्याने कार चालविली. हा वेग इतका भयंकर होता की, अखेर गाडीवरचे नियंत्रण सुटले. चालवणारा स्वत: मात्र बचावला, परंतु त्याने आपला मित्र गमावला. मंगळवारी पहाटे हा भीषण अपघात विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पिरोजशा पुलावर घडला. या अपघातात दिनेश कुलकर्णी(वय-२६) हा तरुण मरण पावला. तर गाडी चालवणारा जितेश निगम(२६) हा वाचला.
ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी घडली. दिनेश आणि जितेश हे दोघे वर्सोवा येथे पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपवून मध्यरात्री ३ वाजता होंडा अकार्ड या मोटारीतून उल्हासनगरला जाण्यासाठी ते निघाले. त्यांची मोटार विक्रोळी येथे आली असता भरधाव वेग ठेवणार्या जितेशचे नियंत्रण सुटले. याचवेळी पुढे जाणार्या ट्रेलरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली.
याची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा जितेश हा घाबरलेल्या अवस्थेत कारच्याबाहेर उभा होता. पाहणीदरम्यान कारमध्ये अडकलेल्या दिनेशला त्यांनी पाहिले. त्यांनी तातडीने त्याला महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराआधीच डॊक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला. हेच त्याच मृत्यूचे कारण ठरले. उल्हासनगर नंबर-२ येथे दिनेश राहत होता तर जितेश हा कल्याणमधील कोळशेवाडीतील रहिवासी आहे.
जितेशच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले, तसेच वाहन चालविण्याचा चालक परवाना नसताना तो कार चालवत होता. त्याच्यावर भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि दुसर्याच्या मॄत्यूस कारणीभूत ठरणे असे गुन्हा नोंदविण्यात आला.
जितेशच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले, तसेच वाहन चालविण्याचा चालक परवाना नसताना तो कार चालवत होता. त्याच्यावर भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि दुसर्याच्या मॄत्यूस कारणीभूत ठरणे असे गुन्हा नोंदविण्यात आला.