पर्यावरणाविषयी नागरिकांची आस्था वाढवावी यासाठी उपक्रम; १५ जानेवारी प्रदर्शन खुले
मुंबई : पर्यावरणाविषयी जनजागृती होऊन झाडे, फुले, फळे आणि भाज्या याविषयी अधिकाधिक प्रेम वृद्धिंगत व्हावे, या साठीच महापालिका व वृक्ष प्राधिकरण दरवर्षी झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन घेते, असे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी आज केले. पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात आजपासून हे प्रदर्शन सुरू झाले. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) येथे ते भरविण्यात आले आहे. १५ जानेवारीपर्यंत ते सुरू असणार आहे.
महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या २२ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात देशमुख बोलत होते. उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) डॉ. किेशोर क्षिरसागर,उप आयुक्त (सा.प्र) सुधीर नाईक, उप आयुक्त (महापालिका आयुक्त) रमेश पवार, उप आयुक्त (परिमंडळ-१) सुहास करवंदे, ई विभागाचे सहायक आयुक्त किशोर देसाई, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी आदींसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, “महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे २१वर्षांपासून हे प्रदर्शन भरविण्यात येते. दरवर्षी त्यात नाविण्य व कल्पकता असते. ‘डिस्ने वर्ल्ड’ ही संकल्पना यावर्षी घेण्यात आली आहे. राणीबागेचे नुतनीकरण करीत असताना याठिकाणी ‘सेल्फी पॉईंट’तयार करण्यात आला आहे. अत्याधुनिक बदलांसह लवकरच ही बाग नागरिकांसाठी खुली करणार आहे.”
“२२ वे झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन १५ जानेवारीपर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनाशुल्क खुले आहे. या प्रदर्शनात फळझाडे, फळभाज्या, परडय़ा, टोपल्या, कुंडय़ांमध्ये वाढविलेली मोसमी / हंगामी फुलझाडे, कुंडय़ांमधील झाडे, गुलाब, वेली, झुलत्या परडीतील झाडे, शोभिवंत झाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, बागेतील निसर्गरचना, कलात्मक पुष्परचना आदी संकल्पना साकारण्यात आल्या आहेत, ” अशी माहिती जितेंद्र परदेशी यांनी दिली.