मुंबई – गोवा महामार्ग सहा तास झाला होता ठप्प
मुंबई – गोवा महामार्ग सहा तास ठप्प झाला होता. जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता ही वाहतूक धिम्या गतीने सुरु करण्यात आली आहे. खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, या तालुक्याना शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं. त्यामुळे खेड, चिपळूण बाजारपेठामध्ये पाणी शिरलं होतं. त्यात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. त्यामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरून जाणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक फरशी तिठा येथून बायपास मार्गे वळविण्यात आली होती. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी पुलावरून होणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक मध्यरात्री एक वाजता बंद करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे.