मुंबई : पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करीत अधिकाधिक लोकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवा, असे आवाहन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३१ वा वर्धापन दिन मंत्रालयात साजरा करण्यात आला. त्यावेळी क्षत्रिय बोलत होते. अपर मुख्य सचिव (वित्त) दिनेश कुमार जैन, प्रधान सचिव (व्यय) व्ही. गिरीराज, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष इंजि. मनोहर पोकळे, कोषाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह राज्यभरातून आलेले विविध राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी, अधिकारी, मंत्रालयातील राजपत्रित अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
क्षत्रिय पुढे म्हणाले की, राजपत्रित अधिकारी महासंघाची ३१ वर्षांची वाटचाल ही देदिप्यमान आहे. महासंघाचे सुमारे दीड लाख सदस्य आहेत. तसेच, राज्यभरातील ७२ विविध राजपत्रित संघटना या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. महासंघाने या वर्धापनदिनानिमित्त काही मागण्या मांडल्या आहेत. यापैकी योग्य आणि रास्त मागण्या ह्या खेळीमेळीच्या वातावरणात मान्य व्हाव्यात, असेही ते म्हणाले.
राज्यासह देशाची वाटचाल ही‘कॅशलेस’ होण्याच्या दिशेने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शासकीय विभागही कॅशलेस होण्याची गरज आहे. सध्या हे प्रमाण 70 टक्के असून हे प्रमाण वाढविण्यासाठी राजपत्रित अधिका-यांनी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे, थेट लाभ हस्तांतर अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) या योजनेचा राजपत्रित अधिका-यांनी अभ्यास करीत अधिकाधिक लोकांना कसा लाभ देता येईल याकडे लक्ष द्यावे, असेही क्षत्रिय यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या तक्रारी ऑनलाईन मांडता याव्यात यासाठी ‘आपले सरकार’ हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. सरकारच्या ३७२ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ६४ लाख नागरिकांनी या वेबपोर्टलच्या माध्यमातून तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी सुमारे ४९ लाख नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देण्यात आले आहे किंवा या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मात्र, यापैकी सुमारे २४५ सेवांचा लाभ अजून एकाही नागरिकाने घेतलेला नाही. या सेवा नागरिकांना सहजसुलभरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही क्षत्रिय यांनी व्यक्त केली.