डिसेंबर 2016 मध्ये परदेशी पर्यटक संख्येत १३.६ टक्के वाढ
नवी दिल्ली : देशात परदेशी पर्यटकांच्या संख्येत डिसेंबर २०१६ मध्ये डिसेंबर २०१५ च्या तुलनेत १३.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. डिसेंबर २०१६ मध्ये १० लाख ३७ हजार पर्यटकांनी देशाला भेट दिली. गेल्या वर्षी याच कालावधीत ९ लाख १३ हजार पर्यटकांनी देशाला भेट दिली होती. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ८८ लाख ९० हजार परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १०.७ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी ८० लाख २७ हजार पर्यटक आले होते.
डिसेंबर २०१६ मध्ये सर्वाधिक पर्यटक अमेरिकेहून (१८.३३ टक्के) आले. त्यापाठोपाठ बांगलादेश (१३.०२ टक्के) आणि इंग्लंड (११.७१ टक्के) इथल्या पर्यटकांचे प्रमाण अधिक राहिले.
डिसेंबर २०१६ मध्ये दिल्ली विमानतळावर (२७.७७ टक्के) सर्वाधिक परदेशी पर्यटक उतरले. मुंबई विमानतळ (१९.८० टक्के) दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
डिसेंबर २०१६ मध्ये पर्यटनातून १६,८०५ कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. डिसेंबर २०१५ मध्ये ते १४,१५२ कोटी रुपये होते.
जानेवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये पर्यटनातून १,५५,६५० कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १५.१ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी १,३५,१९३ कोटी रुपयांचे परदेशी चलन प्राप्त झाले होते.