रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने आज घटनास्थळाची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख असून या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यामुळे 22 जण बेपत्ता झाले होते. त्यातील 20 जणांचे मृतदेह सापडले तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार कोण, प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला की ठेकेदार जबाबदार असे अनेक प्रश्न या दुर्घटनेमुळे उपस्थित झाले होते. दरम्यान सरकारकडून 6 जुलै रोजी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आलं होतं. तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची जबाबदारी आहे. या पथकाने दोन महिन्यात आपला चौकशी अहवाल सादर करायचा आहे.
त्यानुसार हे पथक आज तिवरे इथं दाखल झालं. त्यापूर्वी चिपळूणमध्ये या पथकाची बैठक झाली. त्यानंतर दुपारी हे पथक घटनास्थळी गेले. ज्या ठिकाणी धरण फुटलं त्या ठिकाणची पाहणी या पथकाने पाहणी केली. तसेच जिथून घरं वाहून गेली त्या ठिकाणची सुध्दा या पथकाने पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी देखील या पथकाने संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी धरण फुटण्या आधीची दुरावस्था या पथकासमोर कथन केली.
आमच्या आशा पल्लवित – अजित चव्हाण
या पथकाने आमच्याशी संवाद साधला, आम्ही सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर कथन केली आहे. त्यामुळे आता आमच्या थोड्या आशा पल्लवीत झाल्या की आम्हाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेतील पीडित अजित चव्हाण यांनी दिली..
सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून वेळेत अहवाल सादर केला जाईल – अविनाश सुर्वे – समिती प्रमुख
घटनास्थळी येण्यापूर्वी आमची बैठक झाली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आता आम्ही क्षेत्रीय पाहणी केली. त्यांच्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत, त्याची आम्ही पाहणी केली. या सर्व बाबींचा अभ्यास करून ही दुर्घटना कशी घडली याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. इथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. गेल्या 2 वर्षांपासून इथं ग्रामस्थांना विसर्ग दिसत होता, त्याचा नेमका याच्याशी संदर्भ आहे का, हेही तपासलं जाईल.. एकूणच तांत्रिक आणि पाण्याची पातळी वेगवेगळ्या वेळी आलेले अहवाल, धरणाच्या वेळचं बांधकाम, त्याची स्थिती आणि त्यावेळचं निरीक्षण टिपण हे जे काही उपलब्ध आहे, त्याचा अभ्यास करून काही निष्कर्ष समिती काढेल, याच्यासाठी भेटी होतील, बैठका होतील त्यानंतर राज्यशासनाला वेळेत अहवाल सादर केला जाईल असं या पथकाचे प्रमुख अविनाश सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.