मुंबई : त्यांच्याकडे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेची ताकद होती. त्यांच्याविरोधात शिवसैनिक वडापाव, भाकरी खाऊन रस्त्यावर लढला, असे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महापालिका निवडणुकीत मिळालेले हे यश शिवसैनिकांच्या ताकदी शिवाय कधीही शक्य नव्हते, असे कौतुकदेखील त्यांनी केले. तेव्हा महापौर शिवसेनेचाच होणार, पण दगा फटका होता कामा नये. प्रलोभने-अमिषांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित उमेदवारांना ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
११ लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते. आपल्या अनेक जागा अगदी थोड्या मतांच्या फरकाने गेल्या, असेही ते म्हणाले आहेत. बाळासाहेबांनी दिलेल्या शपथेच्या आणि निष्ठेच्या शिकवणीवर, निखाऱ्यांवर शिवसैनिक वाटचाल करतो आहे, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे.