ठाणे : प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण व जागतिक दर्जाचे छायाचित्र असलेले प्रदर्शन ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “महाराष्ट्र माझा” ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे ठाण्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील टाऊन हॉलमध्ये हे प्रदर्शन शुक्रवार ६ जानेवारी ते रविवार ८ जानेवारी या कालावधीत भरविण्यात येणार आहे. कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ६ जानेवारीस दुपारी ३ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पत्रकार दिनानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील देवदत्त कशाळीकर, विद्याधर राणे, दिनेश भडसाळे, सचिन मोहिते, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, सतीश काळे, सुमीत अहिरे, आदित्य येवले, उमेश मोहोळकर अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या या नामवंत छायाचित्रकारांसह अन्य नामवंत छायाचित्रकारांनी कल्पकतेने काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. ठाण्यातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेली निवडक छायाचित्रेही यावेळी पहावयास मिळतील. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ८ जानेवारीपर्यंत टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, छायाचित्रकार, पत्रकार व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे आणि संजय पितळे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांनी केले आहे. (सौजन्य : महान्यूज. कॊम)