मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. अष्टपैलू अभिनय ही त्यांची खास शैली होती. भूमिका कोणतिही असो, ती लिलया पेलणे हे त्यांचे खास वैशिष्ट्ये होते. धारावी, अर्धसत्य, गांधी, स्पर्श, आक्रोश, मंडी, घाशीराम कोतवाल आदी चित्रपट, नाटकांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओमपुरी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा कोसळली आहे.
चतुरस्त्र अभिनेता गमावला : मुख्यमंत्री
ओम पुरी यांच्या निधनाने अभिनय क्षेत्र समृद्ध करणारा चतुरस्त्र अभिनेता गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सहज आणि दमदार अभिनयाने पुरी यांनी विविधांगी भूमिका अजरामर केल्या. समांतर आणि व्यावसायीक अशा दोन्ही प्रवाहांतील चित्रपटांच्या माध्यमातून ओम पुरी यांनी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा चित्रपटसृष्टीवर उमटविला आहे. त्यांनी साकारलेल्या आक्रोश, अर्धसत्य आदी चित्रपटांतील भूमिका कायम स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
>>>>>>>>>>>>>>>>.
नाट्य आणि सिनेमाक्षेत्रातील दिग्गज अभिनेता हरपला – विनोद तावडे
हुकमी अभियनाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत आणि नाट्य क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि नाट्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या दिग्गज कलाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मराठी नाटक घाशीराम कोतवालवर आधारित हिंदी चित्रपटाद्वारे ओम पुरी यांच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली. देशातील सगळ्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये ओम पुरी हे एक नाव होते. समांतर चित्रपटांपासून ते व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या काही थोड्या कलाकारांमध्ये ओम पुरी यांचा समावेश होतो. ओम पुरी यांचा अभिनय हा सिनेमा आणि नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरला आहे, अशा शब्दात तावडे यांनी ओम पुरी यांच्या निधनाबद्दल आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.