मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश; भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केले स्पष्ट
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण येथील माजी आमदार रमेश कदम हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करतील अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली. चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला पराभव कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
चिपळूण नगर परिषद निवडणुकीची जबाबदारी रमेश कदम यांच्यावर होती. जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव हे या निवडणुकीपासून दूर होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले होते. त्याचा फटका चिपळुणात राष्ट्रवादीला बसून पराभव झाला, असा आरोप कदम यांनी केला होता. यानंतर कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याची उत्कंठा राजकीय वर्तुळात होती. बाळ माने यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आणि मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्यात कदम भाजपात प्रवेश करतील, असे जाहीर केले.