रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : चिपळूणचा विरप्पन कोण? असा प्रश्न वनविभाग आणि पोलिसांना पडला आहे. या दोन्ही विभागांनी राबविलेल्या मोहिमेत गोवळकोट येथे तब्बल १०० नग रक्तचंदनाचा साठा त्यांनी जप्त केला. त्याची किंमत 60 लाखांच्या घरात आहे. या आधीही पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. यामुळे चंदनतस्करीची टोळी विभागात सक्रीय असल्याचे उघड झाले अहे. परंतु, यामागचा विरप्पन कोण? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
रक्तचंदनाचा साठा एका जागेत झाकुन ठेवण्यात आला होता. अजून काही ठिकाणी साठा दडविला असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मागील काही दिवसात 600 नग रक्त चंदनांवर जप्तीची कारवाई केली गेली.
कोण होता विरप्पन?
विरप्पन हा दक्षिण भारतातील कुख्यात चंदन व हत्तीदंत तस्कर होता. क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणार्या विरप्पनवर अनेक हत्या आणि अपहरणांची नोंद होती. १८ ऒक्टोबर २००४ साली पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला. चंदन आणि हस्तीदंताच्या तस्करीतून त्याने मोठी माया कमावली होती.
रक्तचंदनाला कोट्यवधीची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. त्यामुळे या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड तस्करांकडून करण्यात येत आहे. चीन, जपान, सिंगापूर, अरब राष्ट्रे यांसह पाश्चिमात्य राष्ट्रांत रक्तचंदनाच्या लाकडांना मोठी मागणी आहे.
रक्तचंदनाचा उपयोग
रक्तचंदनाचा उपयोग कॊस्मेटीक उत्पादने आणि फर्निचर तसेच दारू तयार करण्यासाठी होतो. मागणी जास्त असल्याने त्याची तस्करी वाढली आहे. चीनमध्ये या लाकडाला सर्वात जास्त मागणी आहे. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत रक्तचंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.