याच तलावात पडून दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला
मुंबई : खाणीत पडून तेथे साचलेल्या पाण्यात पडून दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना चांदीवलीत घडली. फार्म हाऊस रोड येथे असलेल्या मनुभाई कम्पाऊंडमध्ये मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. सद्दाम अब्दुल शेख (21) आणि अस्लम अब्दुल शेख (24) अशी मृतांची नावे आहेत, तर बुडणार्या जावेद शेख (28) या भावाला स्थानिकांनी वाचविले.
मनुभाई कम्पाऊंडमध्ये असणार्या खाणीत पाणी साठून छोटा तलाव निर्माण झाला आहे. सद्दाम याने आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी टाकली आणि त्याला वाचविण्यासाठी दोन्ही भावांनी तलावात उडी टाकली, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री एकाच घरातील तीन युवक बुडाले. यातील जावेदला वाचविण्यात स्थानिकांना यश मिळाले तर सद्दाम आणि अस्लम मरण पावले. रात्रीच्या वेळी शौचविधीसाठी सद्दाम त्या ठिकाणी गेला होता. याचवेळी तोल जाऊन तो पडला, त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोघे भाऊ खाणीत उतरले. ते तिघेही बुडू लागले. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आणि एकाला बुडताना वाचविले.
अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले. परंतु, अंधार असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. चार तासांनंतर सद्दाम आणि अस्लम यांचे मृतदेह मिळाले. शवविच्छेदनासाठी ते राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी डोंगर फोडून दगड काढण्याच्या खाणी होत्या. कालांतराने त्या बंद झाल्या. खोल असलेला हा भाग पाणी साठून आता तलाव बनला आहे.