रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना हा प्रकल्प रद्द झाल्याचं खरं श्रेय ग्रामस्थांचं असून त्यांचाच हा विजय असून शिवसेनेने याचं श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीत बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. शिवसेनेने या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेतली होती. आधी समृद्धीच्या धर्तीवर मोबदला द्या अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक आमदार , खासदारांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेने हा प्रकल्प आता रद्द झाल्याचं श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये, हा प्रकल्प त्यांच्यामुळे रद्द झालेला नाही. हा फक्त स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळेच रद्द झालेला आहे. जर ग्रामस्थांच्या भावना तेवढ्या तीव्र नसत्या तर हे शक्य नव्हतं. त्यामुळे हा केवळ ग्रामस्थांचा विजय आहे. प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा देणार्या ग्रामस्थांचे आपण आभार व अभिनंदन करतो, असे राणे यावेळी म्हणाले.