रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : गुहागर एसटी आगाराच्या वाहकावर चिपळूण पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बुधवारी तेथील चालक व वाहकांनी बेकायदा संप पुकारला आणि सकाळपासून कामबंद आंदोलन केले.यामुळे एसटी बसच्या १४० फेर्या रद्द झाल्या तसेच अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. संध्याकाळपर्यंत या संपावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आले.
कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता वाहकावर कारवाई केली गेली, असा आरोप संपकरी कर्मचार्यांनी केला आहे.
मंगळवारी संध्याकाळी गुहागर आगारातून चिपळूणसाठी एसटी निघाली. याचवेळी एसटीतील वाहकाने रामपूरदरम्यान विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्या एसटीतून प्रवास करणार्या मुलीने केला आहे. या आरोपाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलीस स्थानकात वाहकाविरोधात विनयभंग आणि ऎट्रासिटी ऎक्टअंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला. पोलिसांच्या कारवाईमुळे गुहागर आगारातील चालक-वाहक संतापले आणि त्यांनी आज सकाळपासून संप पुकारला. सकाळी आठ वाजून ३० मिनिटांनंतर एकही एसटी गुहागर आगारातून सुटली नाही. दुपारपर्यंत एक लाख ५२ हजार ५०० रुपयांचे नुकसान एसटीला सोसावे लागले.