रत्नागिरी, (आरकेजी) : कोकणातल्या खास गटारी सणाकरीता परराज्यातून बेकायदेशीररित्या आणले गेलेले विदेशी बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. जवळपास साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
रविवारी गटारी अमवास्या होती. त्या पाश्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी तपासणी नाके सुरु केले होते. बेकायदेशीर दारूची विक्री, विनापरवाना आणली जाणारी दारू यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होते.
दरम्यान गोव्यातून विदेशी बनावटीचा दारू साठा रत्नागिरीच्या दिशेने आणला जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी यांना मिळाली होती. त्यानुसार रत्नागिरी जवळच्या मुंबई गोवा महामार्गावरील पाली इथं सापळा रचण्यात आला होता. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. या तपासणी दरम्यान रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमध्ये गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. या ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे जवळपास ३५ बाँक्स आढळून आले. साडेतीन लाख रुपयांचा हा मद्यसाठा आहे. या मद्यसाठयासह ट्रकहि जप्त करण्यात आला आहे. एकूण 15 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला मद्यसाठा गटारीसणासाठी आणला गेला होता. या प्रकऱणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून ओंकार मयेकर असं पकडण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.