रत्नागिरी : अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यानंतर आता खेड तालुक्यातही काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत.
खेड तालुक्यातील दहीवली गावात गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने जमिनीला भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी जमीनही खचली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
दरम्यान प्रशासनाकडून या भागाची पाहणी करण्यात आली असून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
24 तासांत 41.56 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 41.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात पडला असून मंडणगडमध्ये 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खेड , चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये 50 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. खेडमध्ये 60 मिमी, चिपळूणमध्ये 55 आणि संगमेश्वरमध्ये 52 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.