रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणे आणि प्रवास दरम्यान त्यांच्या सामानाची सुरक्षितता अबाधीत ठेवण्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोचीवली ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई पर्यंतच्या प्रवाशाची झालेल्या सामानाच्या चोरीच्या भरपाईपोटी कोकण रेल्वे महामंडळाने १ लाख ६५ हजाराची भरपाई ४५ दिवासात अदा करावी. अन्यथा त्या भरपाई तेवढ्या दिवसात अदा केली नाहीतर मग १२ टक्के व्याजाने भरपाई अदा करावी लागले. असा आदेश ठाणे ग्राहक न्यायालयाने दिला आहे. अशाप्रकारे पहिलाच ऐतिहासीक निर्णय दिला. या निर्णयाने कोकण रेल्वे महामंडळाला दणका मिळाला आहे. ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचेचे अध्यक्ष टेलगोटे आणि सदस्य त्र्यंबक ए थूल यांनी दिलेल्या माहीतीनुसार, तक्रारदार विनोद नाईक हे आपल्या पत्नी आणि मुलीसह दि. १४ मे २०१५ रोजी कोचीवली ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई असा कोचीवली एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यावेळी दुपारी २.१० वा. कोलाड ते माणगांव दरम्यानच्या स्थानकावर २० ते २५ मिनिटे एक्सप्रेस गाडी थांबली होती. त्याच दरम्यान पत्नीच्या सोन्याच्या दागीन्यांसह मोबाईल असा एकुण २ लाख ९० हजाराच्या ऐवजाची चोरी झाल्याचे नाईक यांनी तक्रारीत म्हटले होते. पत्नीच्या वस्तु चोरीला गेल्याने त्यांना मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तसेच कोकण रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे वस्तू चोरीला गेल्याचा आरोप विनोद नाईक यांनी ठाणे ग्राहक न्यायालयात दिलेल्या तक्रारीत केला. या तक्रारीची सुनावणी ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक निवारण मंचाचे अध्यक्ष टेलगोटे व सदस्य त्र्यंबक ए. थूल यांचे खंडपीठासमोर होवून तक्रारदारांनी केलेला युक्तिावाद ग्राह्य धरून प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेण्याची जबाबदारी कोकण रेल्वे महामंडळाचे कर्तव्य आहे. ही बाब कोरेचे प्रशासन नाकारू शकत नाही. असे स्पष्टपणे सांगून प्रवाशाच्या भरपाईपोटी कोकण रेल्वे महामंडळाने १ लाख, मानसिक त्रासापोटी ५० हजार, मुकदमेसाठी १५ हजार असा एकुण १ लाख ६५ हजाराची भरपाई ४५ दिवसात अदा करण्याचे आदेश देत, जर का ४५ दिवसात भरपाई दिली नाहीतरमग तक्रारदार प्रवासी विनोद नाईक यांना १२ टक्के व्याज दराने भरपाई अदा करावी लागले असे निर्देश ठाणे ग्राहक न्यायालयाने दिले. अशा प्रकारे ग्राहक न्याालयाने कोकण रेल्वे महामंडळाला एक प्रकारचा दणकाच दिला. अशाप्रकारची भरपाई देण्याचा हा ऐतिहासीक निर्णय आहे. या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.