नागपूर : महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींच्या वर गेली आहे. या राज्यात विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असे चार प्रांत आहेत. राज्य कारभारासाठी कुठल्याही राज्याची लोकसंख्या एक कोटीच्या वर नको तसेच राज्यांची लोकसंख्या समान असली पाहिजे, त्यामुळे लहान लहान राज्यांची निर्मिती झालीच पाहिजे, असे रा. स्व. संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी सांगितले. वैद्य यांनी कोकण प्रांताचे नाव घेतल्याने ते कोकण नावाचे छोटे राज्य अस्तित्वात यावे, या मताचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. कोणत्याही राज्याची निर्मिती आंदोलनाशिवाय झाली पाहिजे, असे वैद्य यांनी सांगितले. आजवर अनेक राज्यांची निर्मिती केली गेली. परंतु, राज्यांची रचना योग्यप्रकारे झाली नसल्याचे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. उत्तरप्रदेशची लोकसंख्या १९ कोटी ९८ लाख, झारखंडची लोकसंख्या १० कोटी ४८ लाख आहे. सिक्कीम ६ लाख १० हजार, मिझोरम १० लाख ९७ हजार, नागालॅण्ड ९ लाख, त्रिपुरा ३६ लाख याप्रमाणे लोकसंख्या आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.