मुंबई : डिजिटल इंडीयाचे स्वप्न सरकारने दाखवले, परंतु संसदेत साधे फोन सुरू असणे दुरच साधी वायफाय सुविधाही भाजपा सरकारला अद्याप सुरू करता आला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केली. बुधवारी (ता. १८) राष्ट्रवादी काँग्रेसच्या घाटकोपर येथील अल्पसंख्याक विभाग मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन सुळे यांनी केले . त्यावेळी त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, नवाब मलिक, संजय पाटील, सुचित्रा वाघ, शिवाजीराव नलावडे, अल्प संख्याक विभागाचे मुबई अध्यक्ष सोहेल सुबेदार आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार आहे, असा आरोप ते आपल्या मित्र पक्षावर लावत आहेत आणि तेच लाल दिवा सुरक्षित राहावा म्हणून पुन्हा त्यांच्याशीच युती करीत आहेत, सत्तेसाठी काहीही असे धोरण या पक्षाने राबविले आहे, या भाजपाच्या कार्यपद्धतीवर सुळे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. आम्ही कॊंग्रेससोबत आघाडीसाठी तयार आहोत; सन्मानाने नाते जोडले जावे अशी आमची इच्छा आहे असेही त्या म्हणाल्या.
इतर धर्माच्या नावाखाली मत मागणारे पक्ष हे मुल्सिम बांधवांच्या मतांमध्ये विभागणी व्हावी, म्हणून भाजपासाठी काम करत आहेत. ते पक्ष भाजपाची बी टीम आहे. राष्ट्र्वादी केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे, असे सोहेल सुबेदार यांनी सांगितले.