रत्नागिरी, 10 Sept : खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याच्या पाटीला काळं फासणाऱ्यांचं तोंड काळं होणार असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी दिला आहे. रत्नागिरी इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
सध्या एकीकडे कंगना रनौत विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलेला पाहायला मिळत आहे, त्यातच आज खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील बंगल्यावरील नावाच्या पाटीला काळं फासलं गेल्याची घटना समोर आली आहे. यावरून शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काळं फासण्याचं प्रकरण शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांना याबाबत रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलं असता, ज्यांनी खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याच्या पाटीला काळं फासलं, त्या काळं फासणाऱ्याचं तोंड काळं होणार असा इशारा उदय सामंत यांनी दिली आहे.