मुंबई : मोटारसायकल चालवताना स्टंट करून जीव धोक्यात घालू नका, बाईक सुरक्षित आणि जबाबदारीने चालवा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थाना केले. अंतरमहाविद्यालयीन रस्ते सुरक्षा स्पर्धा कॅस्ट्रॉल कंपनीच्या माध्यमातून युनायटेड वे ऑफ मुंबई, मुंबई विद्यापीठाचा एनएसएस विभाग, मुंबई प्रादेशिक वाहतूक विभाग कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्याद्वारे घेण्यात येत आहे. पूर्व विभागाची स्पर्धा भांडुपमधील आर. ए. डि.ए. व्ही. महाविद्यालयात झाली. त्यावेळी नलावडे यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
तारुण्यात असताना मीही बाईकवर एकदा स्टंट केला होता. त्यावेळी छोटासा अपघात झाला होता, अशी आठवण नलावडे यांनी सांगितली. या स्पर्धेत पूर्व उपनगरातील १२ महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात निवडले गेलेले स्पर्धक १८ फेब्रुवारीला होणार्या अंतिम फेरित सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा युनायटेड फॉर रोड सेफ्टी या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम तीन वर्ष सुरू असणार आहे. सर्वात जास्त अपघात मोटारबाईक वेगाने चालवल्याने होत आहेत. त्यामुळे तरुणांनी बाईक चालविताना काळजी घ्यायला हवी, सुरक्षीतपणे प्रवास करायला हवा, याबाबत या कार्यक्रमात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी युनायटेड वे ऑफ मुंबई या या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी कॅस्ट्रॉल या कंपनीच्या सीएसआर निधीतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती युनायटेड वे ऑफ मुंबईचे संचालक अजय गोवले यांनी दिली.