दिल्ली, 16 Sept : मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली. तसेच, या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत, खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन, मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून, या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी मागणी केली. तसेच याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष देऊन, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांच्या वतीने करण्यात आली.